मुंबई : गोरेगाव येथे राहणाऱ्या सुप्रिया राऊळ (४२) यांना ब्रेन स्ट्रोक झाला. त्यांना वांद्रेतील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, अधिक उपचारकरिता त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल केले होते.मात्र, गुरुवारी त्यांना मेंदूमृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने चार रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
याकरिता त्यांचा लहान भाऊ प्रवीण गावडे याने अवयवदानासाठी पुढाकार घेऊन इतर सदस्यांच्या सहमतीने संमती दिली. या अवयवदानातून दोन किडन्या, फुफ्फुस आणि यकृत दान करण्यात आले आहे. याबद्दल गावडे यांनी सांगितले की, ताईला राहत्या घरी चक्कर आल्याने आम्ही त्यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी निदान करून ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगून उपचार करण्यास सांगितले. मात्र, चार ते पाच दिवसांत त्याठिकाणी आणखी प्रकृती खालावल्याने आम्ही तिला जसलोक रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारदरम्यान डॉक्टरांनी ताईला मेंदूमृत घोषित केले. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि समुदेशकांनी अवयवदानाबाबत माहिती दिली.त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मिळून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयामुळे चौघांना जीवदान मिळाले आहे.