माजी मुख्यमंत्र्यांची सून, आमदार, खासदार मध्यरात्री जरांगे पाटलांच्या भेटीला

जालना : आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता सर्वच पक्षातील आमदार, नेते तसेच निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसत आहेत. यामुळे अंतरवाली सराटीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दिवंगत मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुनबाई संगीता निलंगेकर यांनी नुकतंच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काँग्रेसकडून निलंगा विधानसभेसाठी त्यांचे पती अशोकराव निलंगेकर इच्छुक होते. मात्र निलंग्याची जागा काँग्रेसकडून अभय साळुंके यांना सुटल्याने संगीता निलंगेकर नाराज आहेत. यामुळे संगीता निलंगेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारीची अपेक्षाही व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील आणि संगीता निलंगेकर यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

हिंगोलीचे माजी खासदार शिवाजीराव माने यांनी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी शिवाजीराव माने यांनी भाजपातून छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला होता. माजी खासदार शिवाजीराव माने कळमनुरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते छत्रपती संभाजी राजे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहेत. कळमनुरी मतदारसंघात गावागावात माझा कार्यकर्ता आहे. मनोज जरांगे पाटील यांच आदेश असेल तर मला विजयाची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार शिवाजीराव माने यांनी दिली.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांना अनेक नेते भेटत आहेत. हे सर्व नेते आगामी विधानसभा निवडणूक आणि मराठा मतं याबद्दल प्रामुख्याने चर्चा करताना दिसत आहेत. सध्या जे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत, त्या नेत्यांच्या मतदारसंघात जरांगे पाटील पॅटर्न चालत आहे. त्यामुळे या भेटीगाठी महत्त्वाच्या असल्याचे बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!