दिल्ली : स्पेनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत महापुरामुळे येथे 150 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पूर्व स्पेनमधील व्हॅलेन्सिया शहराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
वर्षभरात पडणारा पाऊस व्हॅलेन्सियामध्ये अवघ्या आठ तासांत पडला. मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला, त्यामुळे अनेकांना सुरक्षित स्थळी जाण्याची संधी मिळाली नाही. अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर शहरातील पूल देखील कोसळला आहे. स्पेनच्या अलीकडच्या इतिहासात पुरामुळे इतक्या लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
स्पेनमधील या विनाशाबाबत अधिकाऱ्यांनी शुक्रवारी इशारा दिला की अनेक ठिकाणी पुल कोसळले आहेत, त्यामुळे बचाव पथकांना मदत पुरवण्यात अडचण येत आहे. व्हॅलेन्सिया शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि रहिवाशांना पाण्याचा वेग वाढल्याने भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागला. तसेच बेपत्ता असणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.सीएनएनच्या अहवालानुसार, स्पेनमध्ये अतिवृष्टी आणि वादळामुळे बहुतेक मृत्यू व्हॅलेन्सियामध्ये झाले आहेत, जे भूमध्य सागरी किनारपट्टीवर आहे आणि जिथे 50 लाखांहून अधिक लोक राहतात. गंभीर परिणाम लक्षात घेता, माद्रिद आणि व्हॅलेन्सिया दरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच शाळा, संग्रहालये आणि सार्वजनिक ग्रंथालये, प्रभावित भागातील इतर सार्वजनिक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.