मांडवगण फराटा : “महाराष्ट्रात येत असलेले उद्योग मोदी शहांनी गुजरातला पळविले आहेत. त्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला असून महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न घसरले आहे. युती शासनाच्या काळात राज्याची वेगाने अधोगती होत असून ती रोखण्यासाठी शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात आले पाहिजे.महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतक-यांची कर्जमाफी करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.
मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि,आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून यांच्यासारखी गद्दारी केली नाही म्हणून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घोडगंगा चालू करण्यासाठी लागणारे कर्ज त्यांना मिळू दिले नाही. काल घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांच्याबरोबर घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून त्याचा मी निषेध करतो. आताच्या काळात प्रामाणिक आणि निष्ठावंत माणसे कमी आढळतात. संकटाच्या काळात पवार साहेबांना साथ देणार्या निष्ठावंत अशोक पवार या नेतृत्वाला शिरूर हवेलीतील जनतेने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे.’ असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.राज्यात जर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर महिलांसाठी महालक्ष्मी योजना राबवून महिलांनी मासिक तीन हजार रुपये चालू करणार, महिलांना मोफत एस.टी. प्रवास, शेतकर्यांना कर्जमाफी, सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी २५ लाखांचा विमा, महाराष्ट्राची भारतातील घसरलेली पत सुधारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी आमदार अशोक पवार यांनी बोलताना सांगितले की, ‘मी साहेबांशी गद्दारी केली नाही यामुळे घोडगंगा चालू करण्यासाठी लागणारे १६० रुपयांचे कर्ज अडवले. करोना काळात पाच कोरोना सेंटर चालवली. त्यावेळी समोरचे उमेदवार तोंड लपवून बसले होते.राज्यात यावेळी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार म्हणजे येणारच असून कोणत्याही परिस्थितीत माझ्या वडिलांचे नाव असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू करणारच आहे असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, राजेंद्र नागवडे, विकास लवांडे, भारती शेवाळे, विश्वास ढमढेरे, राजेंद्र पायगुडे, बाळासाहेब नरके, संजय सातव, वैभव यादव, सुरेखा भोरडे, युवराज दळवी, बाळासाहेब नागवडे, पोपटराव भुजबळ, संभाजी फराटे, दत्तात्रय फराटे, पोपटराव शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. याप्रसंगी घोडगंगाच्या माजी संचालक व मांडवगणच्या माजी सरपंच लतिका जगताप, घोडगंगाचे कामगार नेते महादेव मचाले यांनी मनोगत व्यक्त केले. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शंकरराव फराटे यांनी सूत्रसंचालन केले तर खंडेराव फराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.